मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

मोहिते वडगांव, ता. कडेगाव, जि. सांगली (दि. २० मे २०२६) : जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बु. येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जनजागृती केली.

हा उपक्रम बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी श्री. हणमंतराव (आप्पा) मोहिते यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये कृषिदूत मयूर, अनुज, विघ्नहर, कुणाल, सुशांत, तुषार, प्रविण व रणजित यांनी शेतातील विविध ठिकाणांहून योग्य पद्धतीने मातीचे नमुने कसे घ्यावेत याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच माती नमुना संकलनासाठी लागणारी साधने, नमुना घेताना घ्यावयाची काळजी आणि नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मृदा परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, सामू (pH), सेंद्रिय कर्ब तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती समजण्यास मदत होते, अशी माहिती दिली. मृदा परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करता येत असल्याने उत्पादन खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास श्री. जयवंत मोहिते, सौ. भाग्यश्री मोहिते, सौ. शिलावती मोहिते, श्री. दत्तात्रय मोहिते, श्री. ब्रह्मदेव सरक, श्री. महादेव मिसाळ, श्री. वसंत काळे, श्री. सदाशिव कुंभार, श्री. पांडुरंग मिसाळ आणि श्री. रामचंद्र मिसाळ आदी शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत भविष्यात नियमितपणे मृदा परीक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विद्यार्थ्यांनी शास्त्राधारित शेती तंत्रज्ञान गावपातळीपर्यंत पोहोचवून शेतकरी व विद्यार्थी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जागरूकता निर्माण होऊन शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.


