राज्यशास्र विभागात भारतीय संविधानाचा जागर

राज्यशास्र विभागात भारतीय संविधानाचा जागर

म्हसवड – येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘भारतीय संविधान दिन ‘साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी मुधोजी महाविद्यालय फलटण येथील इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.बी. जी. सरक हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ एम.पी.सोनावणे हे होते.
कार्यक्रमाच्या आरंभी अध्यक्ष- अतिथी व वक्ते यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर.जी. पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.पवार यांनी प्रास्ताविकात भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करून चालू शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात शिकत असलेल्या गरीब होतकरू पाच मुली दत्तक घेऊन त्यांचा कपड्यासह सर्व शिक्षण खर्च करण्यात असल्याचे नमूद केले.
तसेच बी.ए. तृतीय वर्षात राज्यशास्त्र विषयात विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्रमाणपत्र, रोख रक्कम व पारितोषिक प्रदान करणार असल्याचे जाहीर केले. तदनंतर सातारा येथे संपन्न झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वक्ते डॉ. महेशकुमार सोनावणे यांच्या ‘ ‘ “मातीमूळ”या कवितेचा उचित गौरव झाल्याबद्दल राज्यशास्त्र विभागाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. सोनावणे यांनी सत्काराबद्दल राज्यशास्त्र विभागाचे आभार व्यक्त करून आपल्या भाषणात ‘प्रत्येक भारतीय नागरिकाने भारतीय संविधान जाणून घेऊन संविधानाचे प्रामाणिकपणे पालन करावे तसेच राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर राखावा ‘असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला शेवटी राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक एस.डी.माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.