विचारांची उंची, जनविश्वासाचे आश्वासक नेतृत्व!

विचारांची उंची, जनविश्वासाचे आश्वासक नेतृत्व!

मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

लेखक : प्रा. (डॉ.) प्रभाकर रामचंद्र पवार
मराठी विभागप्रमुख, मुधोजी महाविद्यालय, फलटण

समाजजीवनात काही व्यक्तिमत्त्वे आपल्या विचारांनी, कार्याने आणि लोकांशी जपलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याने वेगळी ओळख निर्माण करतात. संयमी स्वभाव, समतोल विचार, सामाजिक प्रश्नांविषयीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास या गुणांच्या बळावर जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण करणारे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे एक आश्वासक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक पैलूंचा आणि समाजाप्रती असलेल्या अपेक्षांचा वेध घेणे औचित्यपूर्ण ठरते.

त्यांच्या कार्यप्रवासाची आठवण करून देणाऱ्या हिंदीतील या ओळी मनाला स्पर्शून जातात—

“मंज़िल उन्हीं को मिलती है,
जिनके सपनों में जान होती है;
पंखों से कुछ नहीं होता,
हौसलों से उड़ान होती है.”

कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी केवळ पद, प्रतिष्ठा किंवा अधिकार पुरेसे नसतात. त्यासाठी दूरदृष्टी, संयम, लोकांशी संवाद साधण्याची वृत्ती आणि समाजाच्या विकासासाठी प्रामाणिक तळमळ आवश्यक असते. या मूल्यांना सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.

संयम आणि समतोल विचार ही नेतृत्वाची ताकद

आजच्या सार्वजनिक जीवनात आक्रमक वक्तृत्व आणि तत्काळ प्रतिक्रिया यांना अनेकदा नेतृत्वाचे लक्षण मानले जाते. मात्र, लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, परिस्थितीचा समतोल विचार करणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे, ही खऱ्या नेतृत्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

मतभेद असले तरी संवादाची दारे खुली ठेवणे आणि विकासाच्या प्रश्नांवर एकत्र येण्याची भूमिका घेणे, ही लोकशाहीची खरी संस्कृती आहे. सार्वजनिक जीवनात संयम, परस्पर सन्मान आणि सकारात्मक दृष्टिकोन जपणाऱ्या नेतृत्वाची आज समाजाला अधिक गरज आहे.

“जो वक्त के साथ बदलता है, वो समझदार कहलाता है;
जो वक्त को बदलने की सोच रखता है, वही रहनुमा कहलाता है.”

बदलत्या काळानुसार समाजाच्या गरजा बदलत आहेत. शिक्षण, रोजगार, शेती, पाणी, उद्योग, ग्रामीण विकास आणि युवकांसाठी नव्या संधी या विषयांकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. या प्रश्नांवर विधायक विचारमंथन आणि सर्वसमावेशक प्रयत्न होणे ही काळाची मागणी आहे.

विकास हीच लोकसेवेची खरी दिशा

विकास म्हणजे केवळ मोठ्या इमारती, रस्ते किंवा विविध योजना नव्हेत. सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, हाच विकासाचा खरा अर्थ आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे, शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणे, युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे, महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होणे आणि गावागावांतील मूलभूत सुविधा सक्षम होणे, या गोष्टी विकासाचे खरे मापदंड आहेत.

विकासाच्या संकल्पनेकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीचे लाभ पोहोचविणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, शैक्षणिक क्षेत्र आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.

याच संदर्भात हिंदीतील या ओळी प्रेरणा देतात—

“रास्ते मुश्किल हों तो हौसले और बढ़ जाते हैं,
जो चलते हैं जुनून से, वही इतिहास बनाते हैं.”

आव्हाने कितीही असली तरी सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर प्रगतीची वाटचाल करता येते. समाजहिताच्या कामात हीच जिद्द महत्त्वाची असते.

लोकशाही मूल्ये आणि सामाजिक सलोखा

लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत. प्रत्येक व्यक्तीच्या मताचा आदर, संवादाची संस्कृती, सामाजिक समतेची जाणीव आणि सर्वांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याची वृत्ती म्हणजे लोकशाही होय.

समाजात विविध विचारप्रवाह, मतमतांतरे आणि अपेक्षा असतात. अशा परिस्थितीत परस्पर सन्मान राखून संवाद साधणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक असते. सार्वजनिक जीवनातील कोणत्याही नेतृत्वाचे महत्त्व केवळ त्याच्या पदावरून ठरत नाही, तर समाजाशी असलेल्या नात्यातून आणि लोकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासातूनही ठरते.

मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढील वाटचालीकडूनही समाजहिताच्या विधायक उपक्रमांना बळ मिळावे, विकासाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका अधिक दृढ व्हावी आणि सामाजिक सलोख्याची भावना वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते.

नव्या पिढीसाठी प्रेरणादायी विचारांची गरज

आजची तरुण पिढी ज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनांच्या बळावर पुढे जात आहे. तिच्याकडे मोठी स्वप्ने आहेत; मात्र या स्वप्नांना योग्य दिशा देण्यासाठी अनुभव, मार्गदर्शन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे.

युवकांना शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होणेही महत्त्वाचे आहे. अनुभवी नेतृत्वाचा मार्गदर्शक दृष्टिकोन आणि नव्या पिढीची ऊर्जा यांचा समन्वय साधला, तर समाजाच्या प्रगतीला निश्चितच नवी दिशा मिळू शकते.

“उम्मीद की किरण बनकर जो अंधेरों में साथ चले,
वही सच्चा साथी है, जो मुश्किलों में हाथ थामे.”

आशावाद, सहकार्य आणि माणुसकी या मूल्यांवर आधारित समाजनिर्मिती हीच कोणत्याही प्रगत समाजाची खरी ओळख असते.

माणुसकीच्या नात्यातच व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती

एखाद्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती केवळ पद, प्रतिष्ठा किंवा अधिकारात नसते; ती लोकांच्या मनात निर्माण झालेल्या आपलेपणात असते. लोकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांविषयी संवेदनशीलता बाळगणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे, या गुणांमुळे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते.

परंपरेचा सन्मान राखताना आधुनिक विचारांचा स्वीकार करणे आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करत विकासाच्या नव्या वाटा शोधणे, ही आजच्या काळाची गरज आहे. सार्वजनिक जीवनात या मूल्यांना महत्त्व प्राप्त झाले, तर समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होऊ शकते.

वाढदिवस : नव्या संकल्पांचा आणि नव्या वाटचालीचा प्रारंभ

वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील नव्या संकल्पांना दिशा देण्याचा प्रसंग असतो.

मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी जीवनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या पुढील वाटचालीत समाजहिताच्या विधायक कार्याला अधिक गती मिळो, युवकांच्या स्वप्नांना बळ मिळो, सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय मिळो आणि समाजात समता, बंधुभाव व सलोख्याची भावना अधिक दृढ होवो, हीच सदिच्छा.

“खुशियों से आपकी झोली भर जाए,
हर कदम पर सफलता आपके साथ आए;
दुआ है हमारी बस इतनी सी,
आपकी हर सुबह नई उम्मीद लेकर आए.”

निसर्ग आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजासाठी कार्य करण्याची अखंड ऊर्जा देवो. आपल्या जीवनात यश, समाधान आणि आनंद नांदो, तसेच समाजाच्या विकासासाठी विधायक योगदान देण्याच्या नव्या संधी प्राप्त होवोत, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त माझ्या पवार परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

— प्रा. (डॉ.) प्रभाकर रामचंद्र पवार
मराठी विभागप्रमुख, मुधोजी महाविद्यालय, फलटण.

@ ॲड. राजू भोसले,  संपादक : झुंजार भारत 




‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व

‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व. : विशेष लेख 

   “माणसं संतप्त होणारच, कारण त्यांची सुखं-दुःखं तीव्र असतात. आपण फक्त त्यांचं ऐकून घ्यायचं असतं आणि त्यांचे हात धरून त्यांना संकटातून बाहेर काढायचं असतं…” अस पक्षाला आणि प्रशासनाला सांगणारा लोकनेता म्हणजे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख होय, आज त्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.

पुण्यातील अलका टॉकीजच्या चौकातून गरवारे कॉलेजकडे जाणाऱ्या एखाद्या तरुणाच्या डोळ्यांत जे स्वप्न असतं, तेच स्वप्न बाभळगावच्या मातीतून आलेल्या एका राजबिंड्या तरुणाच्या डोळ्यांत होतं. आदरणीय विलासरावजी… नावाप्रमाणेच ज्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक अथांग विलास होता; सुसंस्कृततेचा, वक्तृत्वाचा, आणि माणसांवर अतोनात प्रेम करण्याचा!

सार्वजनिक जीवनात असे काही मोजकेच चेहरे होऊन गेले, ज्यांच्या केवळ आठवणीनेही चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे पाणी एकत्र येते. आदरणीय विलासराव देशमुख हे असंच एक ‘उमदं’ रसायन होतं. आज २०२६ च्या रखरखत्या उन्हात, जेव्हा मराठवाड्याची माती तापलेलेली आहे, शेतकरी, कामगार, कष्टकरी अडचणीत आहे, लातूरच वलय डांगाळत आहे, तेव्हा लातूरच्या वेशीवर उभं राहिल्यावर एका माणसाची उणीव काळजाला चटका लावून जाते. ते असते तर? कदाचित संकटाच्या या गडद छायेतही त्याच्या चेहऱ्यावरचं ते आश्वासक हसू पाहून आशेचे पाझर फुटले असते.

आदरणीय विलासरावजी नावाच्या महावृक्षाची पाळंमुळं बाभळगावच्या काळ्या आईत रुजलेली होती. पूर्वजांचा विचारी, सेवेचा वारसा आणि घरातलं पुरोगामी वातावरण, यांमुळे जनसेवेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. पण या सुप्त गुणांना खऱ्या अर्थाने पैलू पाडले ते पुण्याच्या विधी महाविद्यालयाने आणि गरवारे कॉलेजच्या प्रांगणाने. पुण्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक हवेत हा तरुण अधिकच उजळून निघाला.

आदरणीय विलासरावजी कायद्याची पदवी घेऊन जेव्हा लातूरच्या न्यायालयात वकिली करू लागले, तेव्हा न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करण्यापेक्षा त्यांना कोर्टाबाहेरच्या माणसांची दुःखं जास्त ऐकू येत होती. लातूरच्या दुष्काळ निवारण समितीचे सचिव म्हणून काम करताना, दुष्काळी गावांमध्ये पायी फिरून धान्य वाटप करताना या तरुण वकिलांना समजलं की, खरं न्यायालय तर बाहेर आहे आणि तिथे न्यायाची नितांत गरज आहे. मग सुरू झाला . बाभळगावचे ‘सरपंच’ ते राज्याचा ‘शिल्पकार’! आणि देशपातळीवर लातूरचे यशस्वी नेतृत्व असा प्रवास.

सन १९८० ची ती निवडणूक… लातूरच्या राजकारणात एका देखण्या, सुशिक्षित तरुणाने पाऊल ठेवलं आणि विधानसभेची पहिली स्वारी फत्ते केली. त्यानंतर मंत्रिपदाची तालीम सुरू झाली. पहील्यादा आमदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, म्हणजेच १९८२ मध्ये ते गृहराज्यमंत्री झाले. त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत, पोलीस वसाहत आणि शहरात तीन नवी पोलीस ठाणी उभी केली. परिवहन मंत्री म्हणून ‘गाव तिथे एसटी बस’ पोहोचवली, १९८५ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री झाले. महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि संसदीय कामकाज यांसारख्या अष्टपैलू खात्यांचा कारभार सांभाळताना आपली मांड पककी केली. आदरणीय विलासरावांचा कारभारी म्हणून हात मऊ पण पकड घट्ट होती. मांजरा कारखान्याच्या रूपाने त्यांनी सहकाराची पहिली साखरपेरणी केली आणि लातूरचे भाग्य बदलू लागले.

पण नियतीला नेहमीच सरळ रेषा आवडत नाही. सन १९९५ च्या निवडणुकीत विलासरावांना पराभवाचा धक्का बसला. कोणताही सामान्य नेता खचून गेला असता. पण आदरणीय विलासरावजी ‘फिनिक्स’ होते. त्या चार वर्षांच्या काळात त्यांनी कुणावर टीका केली नाही, द्वेष बाळगला नाही. ते पुन्हा लोकांमध्ये गेले, त्यांची गाऱ्हाणी ऐकली. तळापासून सावरून पुन्हा उभं राहण्याची त्यांची ती ऊर्मी अचंबित करणारी होती. परिणामी, १९९९ मध्ये त्यांनी अशी काही झेप घेतली की थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावरच जाऊन विराजमान झाले.

सत्ता चालवतांना ८ पक्षांची आघाडी सांभाळत सरकार चालवणं म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. पण विलासरावांकडे कमालीचा संयम आणि विलोभनीय संवादकौशल्याची जादू होती. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा इतर मित्रपक्ष, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे ते ‘कॅप्टन’ होते. हा सत्तेचा काळ समन्वयाचा सुवर्णकाळ आणि बळीराजाचा आधार ठरला.

पूढे मुख्यमंत्री होताच त्यांनी पहिला शब्द टाकला, “माझा बळीराजा अडचणीत आहे, त्याची वीज कापली जाता कामा नये.” त्यांच्याच काळात तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांची साडेआठ हजार कोटींची कर्जमाफी झाली. माहितीचा अधिकार (RTI) देणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. मुंबईचा कायापालट करताना मोनोरेल आणली, मिठी नदीचा प्रश्न सोडवला आणि गुटखाबंदीचा धाडसी निर्णय घेतला. आदरणीय विलासरावजी हे ‘विश्वासार्हतेचे’ प्रतीक होते. वादळ आल तरी आपली नौका योग्य दिशेने आणि वेगाने चालवून, सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं सामर्थ्य आदरणीय विलासरावजी नावाच्या सुकाणूमध्ये होत.

आदरणीय विलासराव नुसतेच नेते नव्हते, ते रसिक होते, ‘व्यक्ती आणि वल्ली’ होते. त्यांच्या भाषणात जेवढी धार असायची, तेवढीच मिश्किलता त्यांच्या स्वभावात होती. विधिमंडळात त्यांच्या हजरजबाबी टिपण्यांनी विरोधकांचेही चेहरे हसून खुलायचे. यामुळे त्यांची आजही राजकारणापलीकडचा एक ‘उमदा’ नेता अशीच छाप आहे.

त्यांना संगीताची अफाट जाण होती. सुरेश भटांच्या गझला त्यांना तोंडपाठ असायच्या. चित्रपट आणि नाटकांप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्राच्या लावणी आणि तमाशा कलावंतांनाही मानधन वाढवून सन्मान दिला. विद्यापीठांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचे नाव देताना त्यांच्यातील सांस्कृतिक जाणिवा स्पष्ट दिसायच्या. ‘वर्षा’ बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला आदराने भेटणारे, वैशालीताईंच्या साथीने आपल्या मुलांना उत्तम संस्कार देणारे ते कुटुंबवत्सल ‘अण्णा’ होते.

आज विलासरावांची आठवण दाटून येते. राजकारणात विचारधारेचा गोंधळ उडाला आहे, समाजमन दुभंगल आहे, अशा वेळी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा तो दिलदार आणि हसतमुख चेहरा आज आपल्यात नाही, ही जाणीव राज्याला अधिकच विकल करते.

          पण विलासरावांचे विचार संपलेले नाहीत. त्यांनी शिकवलं की, संकट कितीही मोठं असो, लोकसहभागातून त्यावर मात करता येते. आज आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त केवळ त्यांचे स्मरण करणे पुरेसे नाही, तर त्यांनी जपलेला ‘विश्वास’, त्यांनी दाखवलेला ‘विकास’ आणि त्यांची ‘विचारनिष्ठा’ हाच आपला पुढचा मार्ग असला पाहिजे.

अशा आफाट स्मरणशक्तीच्या, प्रसन्न, कनवाळू आणि शब्दाला जागणाऱ्या लोकनेत्याला, महाराष्ट्राच्या या राजबिंड्या पुत्राला मानाचा मुजरा!

लेखक :  राहुल हरिभाऊ इंगळे पाटील
मो. ९८९०५७७१२८
दि. २६ मे २०२६




🌿 नात्यांचे तीन मुखवटे 🌿 जगण्याची आणि जपण्याची कला

  1. नात्यांचे तीन मुखवटे: ललित लेख 

जगण्याची आणि जपण्याची कला

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,

चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।

डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,

संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने॥ 

जगण्याची आणि जपण्याची कला

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,

चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।

डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,

संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने॥ १ ॥

तिखट बोलांची धार येता, कानांवरती आवरणे,

भाषण तुझे गाणे वाटे, लयीत तुजला सावरणे।

क्षमेचा हा कवच पांघरू, गर्वाची ही सोडून ढाल,

शांततेच्या वाऱ्याने मग, नात्याची ही राहे खुशाल॥ २ ॥

शब्दांची ही शस्त्रे आवरू, ओठांवरती शांतता,

मौनदीप हा मनात लावू, संपवून ही कटुता।

कसरत ही अभिनयाची, प्रेमासाठी केले

नात्यांची ही वेल सदा, शब्दावाचून बहरलेली॥ ३ ॥

मानवी आयुष्य म्हणजे नात्यांचा एक सुंदर पण नाजूक कोलाज. ही नाती कधी रेशमी धाग्यासारखी मऊ असतात, तर कधी काचेसारखी संवेदनशील. नात्यांचं हे विणकाम टिकवून ठेवणं ही एक मोठी जीवनकला आहे. ही जीवनकला साध्य करण्यासाठी आपल्या मुद्रेवर तीन मुखवटे परीधान करावे लागतील. हे मुखवटे म्हणजेच आंधळा, बहिरा आणि मुका होता आले पाहीजे. हा केवळ सुवीचार किंवा केवळ उपदेश नसून नातेसंबंधांच्या मंदिरातील ‘मौनदीप’ आहेत. नाती टिकवण्यासाठी एकाच व्यक्तीला अनेकदा हे तीन मुखवटे एकाच वेळी परिधान करावे लागतात. ही कला ज्याला जमली तो खरी नाती जपू आणि वाढवू शकतो.

अर्थात आपल्या नात्यात पहिला मुखवटा येतो तो म्हणजे ‘आंधळेपणा’. याचा अर्थ असा नाही की, धृतराष्ट्र सारख अंधत्व स्विकारायच तर डोळस अंधत्व असल पाहीजे. आपल्याला समोरच्याच्या चुका दिसत असतात, पण, कधी कधी डोळे असूनही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, म्हणजेच प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधणं गरजेचं असतं. समोरच्याच्या उणिवांकडे काणाडोळा करून त्याच्यातील चांगुलपणा शोधणं, हा आंधळेपणा अगतिकतेचा नसून तो समजूतदारपणाचा असतो. सर्व काही पाहणारी नजर नाती वाचवू शकत नाही; कधी कधी मुद्दाम मिटलेले डोळेच घर आणि मनं टिकवतात.

दुसरा मुखवटा आहे ‘बहिरेपणा’. नात्यांच्या प्रवासात कधी कधी कटू शब्दांचे बाण सुटतात, टीकांचे वादळ येते. अशा वेळी अहंकाराला बाजूला सारून ‘क्षमेची शाल’ पांघरून बहिरे व्हावे लागते. टोचणारे शब्द जर मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवले, तर नात्याचा ओलावा आटायला वेळ लागत नाही. ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं ही सहनशीलतेची सर्वोच्च पायरी आहे. यामुळे नात्यातील संवाद जरी थांबला, तरी विसंवाद टाळता येतो.

तिसरा आणि अत्यंत कठीण मुखवटा म्हणजे ‘मुके होणं’. जेव्हा अंतर्मनात शब्दांची धार तीव्र असते, उत्तर देण्याची पूर्ण क्षमता असते, तेव्हा ओठांवर ‘मौनाचा दीप’ लावणं हेच संयमाचं लक्षण आहे. मौन म्हणजे केवळ शांत बसणे नव्हे, तर नात्यांवर चढवलेलं ते एक सुगंधी चंदन आहे. शब्दांनी झालेली जखम भरून येत नाही, पण योग्य वेळी धरलेलं मौन नात्याचं तुटणारं घर पुन्हा सांधू शकतं.

एकाच माणसाला हे तीन चेहरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. हे मुखवटे म्हणजे ढोंगीपणा नसून तो एक ‘अदृश्य अभिनय’ आहे, जो केवळ प्रेमापोटी केला जातो. नात्यातलं घर हे विटा-मातीपेक्षा शब्दांच्या संयमावर आणि शांततेवर उभं असतं. शेवटी, नाती शब्दांनी नाही, तर अनेकदा न बोललेल्या मौनानेच अधिक काळ टिकतात आणि बहरतात. या तीन अवस्थांतूनच नात्यांचं नाजूक विणकाम अखंड आणि अभेद्य राहते. तर मग असे मुखवटे घालून तर पहा ……

राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील

रा.करकट्टा ता.जि.लातूर

मोबाईल ९८९०५७७१२८     




आत्मनिर्भर भारत निर्माण होणं काळाची गरज…✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

 

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

आजच्या जागतिक परिस्थितीकडे पाहिले असता, राष्ट्रांमधील वाढती स्पर्धा, वर्चस्वाची लढाई आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्याची प्रवृत्ती यामुळे युद्धसदृश्य परिस्थिती वारंवार निर्माण होताना दिसते. इतिहासात झालेले पहिले व दुसरे महायुद्ध हे केवळ घटनाच नव्हत्या, तर संपूर्ण मानवजातीला हादरवून टाकणारे अनुभव होते. लाखो लोकांचा मृत्यू, प्रचंड विध्वंस आणि असंख्य कुटुंबांचे उद्ध्वस्त आयुष्य — या सर्वांनी जगाला मोठा धडा दिला; परंतु दुर्दैवाने त्या धड्याचा पुरेसा उपयोग झालेला दिसत नाही.

युद्धाच्या कथा कदाचित ऐकायला रोमांचक वाटू शकतात, पण वास्तवात त्या वेदनादायी असतात. युद्ध सुरू असताना सामान्य माणसाला ज्या यातना सहन कराव्या लागतात, त्या शब्दांत मांडणे कठीण आहे. आपल्या डोळ्यासमोर होणारा विनाश, आप्तस्वकीयांचा मृत्यू आणि असहाय्यता — या सर्व गोष्टी मनाला हेलावून टाकतात.

आजही जगात साम्राज्यवादी विचारसरणी, नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याची स्पर्धा आणि आर्थिक वर्चस्वाच्या हव्यासामुळे संघर्ष निर्माण होतो. काही मोजक्या शक्तिशाली व्यक्ती किंवा राष्ट्रांच्या महत्त्वाकांक्षेमुळे संपूर्ण मानवजातीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कडक नियमावली तयार करून तिचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
जगातील विविध देशांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे एक देश दुसऱ्यावर अवलंबून राहतो. हे परस्परावलंबित्व जर संतुलित नसेल, तर ते संघर्षाचे कारण बनते. आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि इतर ऊर्जास्रोतांसाठी परदेशांवर अवलंबून राहण्याचे परिणाम आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. पुरवठा खंडित झाला की सामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो — हॉटेल व्यवसाय बंद पडणे, इंधनासाठी रांगा, दैनंदिन जीवन विस्कळीत होणे याची उदाहरणे आपण पाहिली आहेत.

यावर एकमेव उपाय म्हणजे स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरता. प्रत्येक राष्ट्राने आपल्या उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तंत्रज्ञान, उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये स्वतःची क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे.

भारताच्या संदर्भात पाहिले तर “आत्मनिर्भर भारत” ही संकल्पना केवळ आर्थिक धोरण नाही, तर एक व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोन आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, आयात कमी करणे, संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणे, तसेच प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवणे — या सर्व गोष्टी या संकल्पनेचा भाग आहेत.
आपण महासत्ता होण्याचा केवळ नारा देण्यापेक्षा, देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, सुरक्षित आणि सक्षम जीवन जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण झाली, तरच खऱ्या अर्थाने राष्ट्र मजबूत होईल.

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सरकारसोबतच प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, लोकसंख्या आणि मागणी — या पाच घटकांवर आधारित विकासाचा पाया अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि सशक्त भारत घडवायचा असेल, तर आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलणे हीच काळाची खरी गरज आहे.
✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.
(M.A., LL.M., M.A.J.M.C.)
भारत निर्माण आंदोलन | The Last Revolution




राष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबुतीने निर्माण करणे काळाची गरज : लेख ✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

विशेष लेख :

आजच्या जागतिक परिस्थितीत कोणत्याही राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पायाभूत सुविधांची भक्कम उभारणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारत महासत्ता आणि विश्वगुरू होण्याची आकांक्षा व्यक्त करीत असताना स्वावलंबन, स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भारतीय संस्कृतीने जगाला “तमसो मा ज्योतिर्गमय” आणि “अत्त दीप भव” यांसारखी उदात्त तत्त्वे दिली. अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि स्वतः प्रकाशमान होणे हा या तत्त्वांचा मूलभूत संदेश आहे. मात्र आजच्या परिस्थितीत या मूल्यांचा विसर तर पडत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्राच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शासनयंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि समाजाने या तत्त्वांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांमुळे अनेक देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होताना दिसत आहे. उदाहरणार्थ, जागतिक राजकीय तणावामुळे इंधन आणि गॅससारख्या आवश्यक वस्तूंवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. यामुळे देशातील नागरिकांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी कार्यक्रम पुढे ढकलावे लागत असून, शहरांमधील खानावळी चालवणाऱ्यांना पर्याय म्हणून चुली पेटवाव्या लागत असल्याचेही दिसून येते.
या परिस्थितीमुळे एक प्रश्न निर्माण होतो—जीवनावश्यक वस्तूंसाठी आपण अजूनही इतर राष्ट्रांवर अवलंबून का आहोत? गॅस, वीज, शेतीसाठी लागणारी खते, बियाणे आणि तंत्रज्ञान यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर देशातच होणे आवश्यक आहे. देश स्वयंपूर्ण झाला तर जागतिक संकटांच्या काळातही नागरिकांना मूलभूत अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
स्वावलंबन म्हणजे केवळ घोषणांमध्ये मर्यादित राहणे नव्हे. ज्या क्षेत्रांत आपण आयात किंवा परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून आहोत, त्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योग, संशोधन आणि तंत्रज्ञान अधिक सक्षम करणे हेच खरे आत्मनिर्भरतेचे लक्षण आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये मजबूत पायाभूत सुविधा उभारल्यास देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतो.
गरिबी निर्मूलनाबाबत अनेक वर्षांपासून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र केवळ अनुदान किंवा मोफत योजनांमुळे कायमस्वरूपी गरिबी दूर होत नाही, असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि संशोधनासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्यास समाजातील दुर्बल घटकांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
पायाभूत सुविधांचा विकास केल्याने केवळ उद्योगच नव्हे तर रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे गरिबांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळते. संशोधन, उत्पादन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास देशाची आर्थिक ताकद वाढते आणि गरिबी कमी होण्यास मदत होते.
आजच्या तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची गरज आहे. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण भारत घडविणे शक्य होईल.

लेखक:
— ॲड. पुजा प्रकाश एन.
(M.A., LL.M., M.A.J.M.C.)
भारत निर्माण आंदोलन – The Last Revolution