गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू, बेमुदत संपाचा निर्धार कायम
महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आज फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कर्मचाऱ्यांनी फलटण तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत शासनापुढे मागण्या मांडल्या. तसेच, निवासी नायब तहसीलदार श्री. अभिजीत सोनवणे यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
👉 सदर निवेदन स्वीकारताना निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी या सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
🚩 संपा बरोबरच महाविद्यालयाच्या गेटसमोर रोज ठराविक वेळ ठिय्या आंदोलन सुरू
मुधोजी महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी
कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र येत महाविद्यालयाच्या गेटसमोर ठाण मांडून बसले आहेत.
👉 “मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
📢 शासनाच्या दुर्लक्षामुळे संप तीव्र
समन्वय समितीच्या वतीने मागील १५ महिन्यांपासून सातत्याने आंदोलन, निवेदने व पाठपुरावा करूनही शासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने आणि विधानसभेत मान्य झालेल्या मागण्यांवरही अंमलबजावणी न झाल्यामुळे अखेर २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
🏫 परीक्षा व प्रशासकीय कामकाजावर परिणाम
सध्या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असताना या संपामुळे परीक्षा प्रक्रिया, निकाल, तसेच महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवरही त्याचा परिणाम जाणवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
📌 प्रमुख प्रलंबित मागण्या.
कर्मचारी संघटनेने शासनाकडे खालील महत्त्वाच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे:
1. ✅ जुनी पेन्शन योजना लागू करावी (१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी) 2. ✅ रिक्त पदे तातडीने भरावीत व चतुर्थश्रेणी भरतीवरील बंदी उठवावी 3. ✅ १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू करावी 4. ✅ सेवानिवृत्तीचे वय 60 करा 5. ✅ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान न्याय व वेतन संरचना द्यावी 6. ✅ कंत्राटी, तात्पुरत्या व अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे 7. ✅ सेवाशर्ती स्पष्ट करून पदोन्नती, वेतनवाढ व सेवा संरक्षण सुनिश्चित करावे 8. ✅ आरोग्य विमा व सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा लागू कराव्यात 9. ✅ निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ तातडीने लागू करावेत 10. ✅ प्रलंबित आर्थिक व प्रशासकीय प्रश्न तत्काळ निकाली काढावेत 11. ✅ रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी तातडीने भरती करावी
12. ✅ शैक्षणिक संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात 13. ✅ अन्यायकारक निर्णय व धोरणांवर पुनर्विचार करून सुधारित शासन निर्णय जारी करावेत
✊ घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र
तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी
“आमच्या मागण्या मान्य करा!”,
“शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा, विजय असो!”
अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की,
👉 “मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.”
👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी
या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, अमरसिंह घोरपडे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक-निंबाळकर, आशालता बनकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार , पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी , अनिल वाजे , लहू चव्हाण , दीपक रणदिवे, जगदीश बोराटे , योगेश आडके आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
⚠️ शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा – मागणी
या संपामुळे शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
✍️ — ॲड. राजू भोसले संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर, मुधोजी महाविद्यालय येथील कर्मचारी संपात सहभागी….
फलटण प्रतिनिधी:
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर,
📌 राज्यभरातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता; विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम,
मुधोजी महाविद्यालय येथील कर्मचारी संपात सहभागी… निवेदन सादर.
फलटण प्रतिनिधी:महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये सातारा जिल्ह्यातील मुधोजी महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचे निवेदन कॉलेज कर्मचारी युनियनचे युनिट प्रमुख दिलीप कुमरे व इतर प्रमुख कर्मचारी यांनी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांना निवेदन दिले. यावेळी संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, संदीप फडतरे अमरसिंह घोरपडे, किरण जाधव, कॉलेज एलमसी सदस्य फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक निंबाळकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार , बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार हे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.
📢 शासनाच्या दुर्लक्षामुळे संपाचा निर्णय
समन्वय समितीने मागील १५ महिन्यांत सात वेळा लक्षवेधी आंदोलने करूनही शासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही. मुख्यमंत्र्यांची भेटही मिळाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विधानसभेत मान्य झालेल्या मागण्यांवरही कार्यवाही न झाल्याने अखेर नाईलाजास्तव बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
📚 परीक्षांवर होणार परिणाम
सध्या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असून, या संपामुळे परीक्षा व प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर त्याचे परिणाम जाणवू शकतात.
📌 प्रमुख प्रलंबित मागण्या
1. जुनी पेन्शन योजना लागू करावी (१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी)
या संपामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
✍️ — 📰 ॲड. राजू भोसले, संपादक – झुंजार भारत (सातारा) दिनांक: 21 एप्रिल 2026 |
म्हसवड येथे मंत्री भरतशेठ गोगावले यांची बाबर कुटुंबीयांना सदिच्छा भेट
म्हसवड (ता. माण) येथे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोद्यान मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी बाबर कुटुंबीयांना सदिच्छा भेट देत आपुलकीचा संवाद साधला.
यावेळी ॲड. इंद्रजीत बाबर व कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी मंत्री महोदयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भेटीदरम्यान मंत्री गोगावले यांनी नवदांपत्य इंद्रजीत व हर्षदा यांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उद्योजक निखिल देवकर व प्रा. शरयू देवकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थितांनी मंत्री महोदयांशी विविध विषयांवर चर्चा करत समाधान व्यक्त केले.
सदर भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न
फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रशासकिय कर्मचारी तसेच प्राध्यापकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान अटीतटीच्या आणि रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रा. डॉ. योगेश माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विक्की गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांचे महाविद्यालय प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेमुळे कर्मचारी वर्गामध्ये मध्ये क्रीडाभावना व स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिसंवाद उत्साहात संपन्न
म्हसवड : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे भाषा (मराठी, हिंदी व इंग्रजी) वाङ्मय विभागाच्या वतीने “साहित्य निर्मिती, आकलनातील संधी आणि आव्हाने : मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा आणि साहित्याचा दृष्टिकोन” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिसंवाद उत्साहात संपन्न झाला.
या परिसंवादाचे आयोजन भाषा वाङ्मय विभाग, सिद्धवी फाउंडेशन (तेलंगणा) व महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, महाविद्यालय विकास समितीचे व्हा. चेअरमन मा. ॲड. पृथ्वीराज राजेमाने, ट्रेझरर हेमंत रानडे तसेच प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
परिसंवादाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच शिवाजी विद्यापीठ गीत गाऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी परिसंवाद आयोजित करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले.
परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राणिया लॅम्पू (ग्रीस), डॉ. श्रीनिवास राव, श्री. प्रकाश कोलाराम (अमेरिका), डॉ. डिक्शन ॲडम (घाना), प्रो. जलादी रवी (आंध्र प्रदेश), डॉ. राधा नारायण, डॉ. सोनी शर्मा (बिहार) व डॉ. जगदीश दिनकर शेवते (महाराष्ट्र) यांनी उपस्थिती दर्शविली. विशेष अतिथी म्हणून डॉ. सोलोमन बेन्नी (आंध्र प्रदेश), डॉ. राजू सी.पी. (केरळ) तसेच सिद्धवी फाउंडेशनचे अध्यक्ष नागाबाबू अब्बाराजू सहभागी झाले.
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉ. सोनी शर्मा, डॉ. राधा नारायण आणि डॉ. जगदीश शेवते यांनी जागतिक स्तरावरील भाषाविषयक विचारांची मांडणी केली. टेक्निकल सेशनची जबाबदारी डॉ. संग्राम शिंदे (हिंदी विभाग), डॉ. सरिता माने (इंग्रजी विभाग) तर मराठी विभागाची जबाबदारी डॉ. मीरा देठे यांनी पार पाडली.
दिवसभर चाललेल्या या परिसंवादात राज्य, देश तसेच परदेशातील प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांनी एकूण ४२ शोधनिबंधांचे सादरीकरण केले. तसेच २३० प्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या परिसंवादाचे आयोजन इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन भालके, हिंदी विभाग प्रमुख डॉ. रमेश बोबडे व मराठी विभाग प्रमुख डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्र. प्राचार्य, आयक्यूएसीचे चेअरमन प्रा. देवेंद्र रणवरे, डॉ. जितेंद्र बनसोडे, प्रा. अंजली माने, बॉटनी विभागप्रमुख डॉ. सुजित जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नितीन भालके यांनी उपस्थित मान्यवर, अतिथी व संशोधकांचे आभार मानले. राष्ट्रगीताने परिसंवादाची सांगता करण्यात आली.
मुधोजी महाविद्यालयात अभिरूप निवडणूक प्रक्रिया उत्साहात संपन्न
फलटण : विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच मतदानाचे महत्त्व समजावे या उद्देशाने फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत “अभिरूप निवडणूक प्रक्रिया (Mock Electoral Process)” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलाशाखा प्रमुख डॉ. ए. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर निवडणूक प्रक्रियेचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले असून हा उपक्रम प्रा. गिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.त्यांना प्रा. प्रियांका शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विद्या शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या अभिरूप निवडणूक प्रक्रियेत एकूण ५३६ विद्यार्थ्यांनी व १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १०.०० वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली असून ही प्रक्रिया दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरळीतपणे पार पडली. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.
या निवडणुकीत एकूण ६२६ मते पडली. त्यापैकी १६ मते बाद झाली, तर १३ मते NOTA ला मिळाली. निकालानुसार बी.ए. भाग दोनची विद्यार्थिनी तनुजा कुमकाले हिने २८१ मते मिळवून ११९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला.तर बी.ए. भाग एकचा विद्यार्थी आदित्य रणदिवे याला १५६ मते, तर बी.ए. भाग तीनचा विद्यार्थी विनय शिंदे याला १६२ मते मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेत धीरज जाधव यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच शिवाजंली रणदिवे (पहिले मतदान अधिकारी), श्रुतिका कदम (दुसरे मतदान अधिकारी) आणि पायल जाधव (तिसरे मतदान अधिकारी) यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीतील मतदान प्रक्रिया, गुप्त मतदान प्रणाली, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी – प्रा. श्रेयस कांबळे
मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे.-प्रा. श्रेयस कांबळे
मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे असे मत फलटण येथील विधी महाविद्यालयाचे प्रा. श्रेयस कांबळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे मराठी भाषा गौरव दिन वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले.
मराठी साहित्य हे आज जगभर पोहोचलेले दिसते. यामध्ये संत पंथ थोर युगपुरुष साहित्यिक कवी लेखक यांचे फार मोठे योगदान आहे. मराठी भाषा ही साधी सरळ सोपी असून ती वापरायला अधिक दर्जेदार आहे या भाषेचा गोडवा इतर भाषेपेक्षा फार निराळा आहे त्यामुळे ही भाषा आज जगभर पोहोचलेली दिसत असून त्याचा विस्तार व वाढ करण्याचे काम आपणा सर्वांच्या आहे.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका जाधव एम. डी., ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे, विद्या जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रेयस कांबळे पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेतून राज्यकारभार सुरू करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला व मराठी भाषेचा विस्तार सुरू झाला. पुढे हीच मराठी भाषा वाढविण्यामध्ये अनेक थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे.
चक्रधर स्वामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच अनेक थोर संत यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्या वाणीने व लेखणीने मोठे योगदान दिले आहे. ही मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांचे आहे त्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झाले अतिक्रमणे झाली तरी मराठी भाषा आजही जशीच्या तशी ताट मानेने उभी आहे.
मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे व इतर भाषेतील शब्द वापरणे टाळणे काळाची गरज आहे.
थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व साहित्यिकांनी दिलेल्या योगदानातून मराठी भाषेचा कणा ताठ आहे त्यामुळे ही भाषा आपली मातृभाषा म्हणून प्रत्येकाने आईप्रमाणे जपली पाहिजे मातृभाषा टिकली तरच आपल्या अस्तित्व टिकेल त्यामुळे माय मराठी ला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात आईचे स्थान दिले पाहिजे.
यावेळी सौ जाधव एम.डी. उपशिक्षक गायकवाड ए. आय. तसेच विद्यार्थीनी तनया जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनवलकर ए. ए. यांनी केले तर आभार कु. हन्नूरे एस.एम. यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
रॅगिंगमुक्त परिसरासाठी श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा पुढाकार
‘अँटी-रॅगिंग’ भित्तिपत्रकांचे दिमाखात अनावरण
म्हसवड, दि. १६ (प्रतिनिधी):
रॅगिंग ही केवळ एक वाईट प्रथा नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे ‘अग्रणी महाविद्यालय उपक्रम’ व ‘अँटी-रॅगिंग समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने “रॅगिंग जागरूकता : अँटी-रॅगिंग भित्तिपत्रकांचा” अनावरण सोहळा सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) उत्साहात पार पडला.
या भित्तिपत्रकांचे अनावरण मुधोजी कॉलेज, फलटण येथील निवृत्त प्रा. उज्वला पिसाळ-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
🟡 “रॅगिंगविरुद्ध न घाबरता आवाज उठवा”
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. उज्वला पिसाळ-देशमुख म्हणाल्या,
“रॅगिंगसारख्या गैरप्रकारांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी धैर्याने त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्वरित महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग समितीशी संपर्क साधावा. एकमेकांचा आदर राखणे आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.”
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अॅड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने तसेच महिंद्रा ग्रुप नांदी फाउंडेशनच्या ट्रेनर कोमल बनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. संजय दिक्षित सर होते, तर आयक्यूएसी (IQAC) चेअरमन प्रा. रणवरे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या उपक्रमाचे नियोजन अँटी-रॅगिंग समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. प्रज्ञा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. समिती सदस्य प्रा. बी. बी. मैद, प्रा. ए. आर. माने मॅडम, प्रा. अॅड. डॉ. कुलकर्णी मॅडम व प्रा. आर. जे. पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. भित्तिपत्रकांच्या माध्यमातून रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रभावी माहिती देण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. ए. आर. माने मॅडम यांनी उपस्थित पाहुणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात शिस्त, सुरक्षितता आणि सौहार्दाचे वातावरण अधिक दृढ होईल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.
श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात ‘ एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट ‘कार्यशाळेचे आयोजन
म्हसवड :येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी व्यवसायाभिमुख विशेष उपक्रम म्हणून`महिंद्रा प्राइड क्लासरूम ‘ व ‘महिंद्रा ग्रुप ‘संचलित, नांदी फाउंडेशनच्या वतीने आयोजित बुधवार दि.११/०२/२०२६ रोजी “एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट ” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सकाळी ९. ०० ते १.०० या वेळेत सलग सहा दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत ” कॅपॅसिटी बिल्डिंग अँड स्किल असेसमेंट बोर्ड “, “महिला सबलीकरण कक्ष “, “शिवाजी विद्यापीठ स्किल डेव्हलपमेंट विभाग “व “स्वयंसिध्दा सेंटर “हे विभाग कार्यरत असून प्रोफेशनल सॉफ्ट स्किल्स ट्रेनर मा.कोमल बंडगर या सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यशाळेत समन्वयक म्हणून प्रा. निलोफर तांबोळी, प्रा.डॉ.जयश्री चव्हाण, प्रा. डॉ,प्रज्ञा माने , प्रा.डॉ नितीन भालके,प्रा.डॉ.सुजाता देशमुख व आयक्यूएसी समन्वयक प्रा.देवेंद्र रणवरे, हे प्रशिक्षणार्थी व मार्गदर्शक यांच्यात समन्वय साधणार आहेत, अशी माहिती कार्यशाळा नियोजन समितीतील प्रा.मनीषा सावंत , प्रा. अंजली माने, प्रा. एम एस चव्हाण, प्रा. डॉ. संतोष लाळगे , प्रा.बाबासाहेब मैंद यांनी दिली.
सदर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक – निंबाळकर, चेअरमन, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, कृषी उत्पन्न बाजार समिती,फलटण माजी नगराध्यक्ष फलटण नगर परिषद फलटणचे मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक- निंबाळकर ,सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक -निंबाळकर,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे व्हा.चेअरमन मा.श्रीमंत ॲड.पृथ्वीराज राजेमाने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे ट्रेझरर मा. हेमंत रानडे, प्रशासकीय अधिकारी मा. प्राचार्य अरविंद निकम हे सहकार्य करणार आहेत.
प्रस्तुत कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना कौशल्य करिअर व रोजगाराचा लाभ होणार असून बहुसंख्य विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ .संजय दीक्षित यांनी केले आहे .
संख्याशास्त्र विषयातील “Minor V: Association and Correlation Analysis” हे नवे पाठ्यपुस्तक प्रकाशित
संख्याशास्त्र विषयातील “Minor V: Association and Correlation Analysis” हे नवे पाठ्यपुस्तक प्रकाशित
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण–2020 (NEP–2020 2.0) अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमानुसार बी.एस्सी. भाग दोन, सत्र तीन (संख्याशास्त्र) या वर्गासाठी “Minor V: Association and Correlation Analysis” हे पाठ्यपुस्तक ज्योतीचंद्र पब्लिकेशन, लातूर यांच्याकडून प्रकाशित करण्यात आले आहे.
सदर पुस्तकामध्ये अभ्यासक्रमातील संकल्पनांची शास्त्रीय, सुलभ व अभ्यासक्रमाभिमुख मांडणी करण्यात आली असून, संकल्पनांची स्पष्टता, सोपी व समर्पक उदाहरणे तसेच परीक्षाभिमुख दृष्टिकोन यामुळे विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक आकलन दृढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या पुस्तकाचे लेखन
प्रा. हर्षवर्धन श्रीकांत कुलकर्णी (फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड),
प्रा. राकेश हरिचंद्र वाघ (एस.पी.डी.एम. आर्ट्स, एस.बी.बी. अँड एस.एच.डी. कॉमर्स व एस.एम.ए. सायन्स कॉलेज, शिरपूर, जि. धुळे),
प्रा. ज्ञानेश्वर एकनाथ नरवडे (देओगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर)
आणि
प्रा. प्रियांका श्रीकांत कुलकर्णी (नूतन मराठी विद्यालय प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे)
यांनी संयुक्तरित्या केले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन प.पू. गोविंद महाराज उपळेकर मंदिर संस्थांचे विश्वस्त समितीचे सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब) यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. अरविंद रानडे उपस्थित होते.
या प्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खजिनदार मा. हेमंत रानडे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ॲड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, तसेच श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांनी लेखकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.