मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

 

फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रशासकिय कर्मचारी तसेच प्राध्यापकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान अटीतटीच्या आणि रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रा. डॉ. योगेश माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विक्की गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांचे महाविद्यालय प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेमुळे कर्मचारी वर्गामध्ये मध्ये क्रीडाभावना व स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.




राष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबुतीने निर्माण करणे काळाची गरज : लेख ✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

विशेष लेख :

आजच्या जागतिक परिस्थितीत कोणत्याही राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पायाभूत सुविधांची भक्कम उभारणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारत महासत्ता आणि विश्वगुरू होण्याची आकांक्षा व्यक्त करीत असताना स्वावलंबन, स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भारतीय संस्कृतीने जगाला “तमसो मा ज्योतिर्गमय” आणि “अत्त दीप भव” यांसारखी उदात्त तत्त्वे दिली. अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि स्वतः प्रकाशमान होणे हा या तत्त्वांचा मूलभूत संदेश आहे. मात्र आजच्या परिस्थितीत या मूल्यांचा विसर तर पडत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्राच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शासनयंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि समाजाने या तत्त्वांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांमुळे अनेक देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होताना दिसत आहे. उदाहरणार्थ, जागतिक राजकीय तणावामुळे इंधन आणि गॅससारख्या आवश्यक वस्तूंवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. यामुळे देशातील नागरिकांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी कार्यक्रम पुढे ढकलावे लागत असून, शहरांमधील खानावळी चालवणाऱ्यांना पर्याय म्हणून चुली पेटवाव्या लागत असल्याचेही दिसून येते.
या परिस्थितीमुळे एक प्रश्न निर्माण होतो—जीवनावश्यक वस्तूंसाठी आपण अजूनही इतर राष्ट्रांवर अवलंबून का आहोत? गॅस, वीज, शेतीसाठी लागणारी खते, बियाणे आणि तंत्रज्ञान यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर देशातच होणे आवश्यक आहे. देश स्वयंपूर्ण झाला तर जागतिक संकटांच्या काळातही नागरिकांना मूलभूत अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
स्वावलंबन म्हणजे केवळ घोषणांमध्ये मर्यादित राहणे नव्हे. ज्या क्षेत्रांत आपण आयात किंवा परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून आहोत, त्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योग, संशोधन आणि तंत्रज्ञान अधिक सक्षम करणे हेच खरे आत्मनिर्भरतेचे लक्षण आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये मजबूत पायाभूत सुविधा उभारल्यास देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतो.
गरिबी निर्मूलनाबाबत अनेक वर्षांपासून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र केवळ अनुदान किंवा मोफत योजनांमुळे कायमस्वरूपी गरिबी दूर होत नाही, असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि संशोधनासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्यास समाजातील दुर्बल घटकांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
पायाभूत सुविधांचा विकास केल्याने केवळ उद्योगच नव्हे तर रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे गरिबांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळते. संशोधन, उत्पादन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास देशाची आर्थिक ताकद वाढते आणि गरिबी कमी होण्यास मदत होते.
आजच्या तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची गरज आहे. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण भारत घडविणे शक्य होईल.

लेखक:
— ॲड. पुजा प्रकाश एन.
(M.A., LL.M., M.A.J.M.C.)
भारत निर्माण आंदोलन – The Last Revolution




श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिसंवाद उत्साहात संपन्न


म्हसवड : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे भाषा (मराठी, हिंदी व इंग्रजी) वाङ्मय विभागाच्या वतीने “साहित्य निर्मिती, आकलनातील संधी आणि आव्हाने : मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा आणि साहित्याचा दृष्टिकोन” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिसंवाद उत्साहात संपन्न झाला.

        या परिसंवादाचे आयोजन भाषा वाङ्मय विभाग, सिद्धवी फाउंडेशन (तेलंगणा) व महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, महाविद्यालय विकास समितीचे व्हा. चेअरमन मा. ॲड. पृथ्वीराज राजेमाने, ट्रेझरर हेमंत रानडे तसेच प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

परिसंवादाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच शिवाजी विद्यापीठ गीत गाऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी परिसंवाद आयोजित करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले.

परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राणिया लॅम्पू (ग्रीस), डॉ. श्रीनिवास राव, श्री. प्रकाश कोलाराम (अमेरिका), डॉ. डिक्शन ॲडम (घाना), प्रो. जलादी रवी (आंध्र प्रदेश), डॉ. राधा नारायण, डॉ. सोनी शर्मा (बिहार) व डॉ. जगदीश दिनकर शेवते (महाराष्ट्र) यांनी उपस्थिती दर्शविली. विशेष अतिथी म्हणून डॉ. सोलोमन बेन्नी (आंध्र प्रदेश), डॉ. राजू सी.पी. (केरळ) तसेच सिद्धवी फाउंडेशनचे अध्यक्ष नागाबाबू अब्बाराजू सहभागी झाले.

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉ. सोनी शर्मा, डॉ. राधा नारायण आणि डॉ. जगदीश शेवते यांनी जागतिक स्तरावरील भाषाविषयक विचारांची मांडणी केली. टेक्निकल सेशनची जबाबदारी डॉ. संग्राम शिंदे (हिंदी विभाग), डॉ. सरिता माने (इंग्रजी विभाग) तर मराठी विभागाची जबाबदारी डॉ. मीरा देठे यांनी पार पाडली.

दिवसभर चाललेल्या या परिसंवादात राज्य, देश तसेच परदेशातील प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांनी एकूण ४२ शोधनिबंधांचे सादरीकरण केले. तसेच २३० प्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
या परिसंवादाचे आयोजन इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन भालके, हिंदी विभाग प्रमुख डॉ. रमेश बोबडे व मराठी विभाग प्रमुख डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी केले होते.

   कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्र. प्राचार्य, आयक्यूएसीचे चेअरमन प्रा. देवेंद्र रणवरे, डॉ. जितेंद्र बनसोडे, प्रा. अंजली माने, बॉटनी विभागप्रमुख डॉ. सुजित जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नितीन भालके यांनी उपस्थित मान्यवर, अतिथी व संशोधकांचे आभार मानले. राष्ट्रगीताने परिसंवादाची सांगता करण्यात आली.




मुधोजी महाविद्यालयात अभिरूप निवडणूक प्रक्रिया उत्साहात संपन्न


फलटण : विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच मतदानाचे महत्त्व समजावे या उद्देशाने फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत “अभिरूप निवडणूक प्रक्रिया (Mock Electoral Process)” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलाशाखा प्रमुख डॉ. ए. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर निवडणूक प्रक्रियेचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले असून हा उपक्रम प्रा. गिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. त्यांना प्रा. प्रियांका शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विद्या शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या अभिरूप निवडणूक प्रक्रियेत एकूण ५३६ विद्यार्थ्यांनी व १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १०.०० वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली असून ही प्रक्रिया दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरळीतपणे पार पडली. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.
या निवडणुकीत एकूण ६२६ मते पडली. त्यापैकी १६ मते बाद झाली, तर १३ मते NOTA ला मिळाली. निकालानुसार बी.ए. भाग दोनची विद्यार्थिनी तनुजा कुमकाले हिने २८१ मते मिळवून ११९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. तर बी.ए. भाग एकचा विद्यार्थी आदित्य रणदिवे याला १५६ मते, तर बी.ए. भाग तीनचा विद्यार्थी विनय शिंदे याला १६२ मते मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेत धीरज जाधव यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच शिवाजंली रणदिवे (पहिले मतदान अधिकारी), श्रुतिका कदम (दुसरे मतदान अधिकारी) आणि पायल जाधव (तिसरे मतदान अधिकारी) यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीतील मतदान प्रक्रिया, गुप्त मतदान प्रणाली, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी –  प्रा. श्रेयस कांबळे

 

 

मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे.-प्रा. श्रेयस कांबळे

मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे असे मत फलटण येथील विधी महाविद्यालयाचे प्रा. श्रेयस कांबळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे मराठी भाषा गौरव दिन वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले.

मराठी साहित्य हे आज जगभर पोहोचलेले दिसते. यामध्ये संत पंथ थोर युगपुरुष साहित्यिक कवी लेखक यांचे फार मोठे योगदान आहे. मराठी भाषा ही साधी सरळ सोपी असून ती वापरायला अधिक दर्जेदार आहे या भाषेचा गोडवा इतर भाषेपेक्षा फार निराळा आहे त्यामुळे ही भाषा आज जगभर पोहोचलेली दिसत असून त्याचा विस्तार व वाढ करण्याचे काम आपणा सर्वांच्या आहे.

यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका जाधव एम. डी., ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे, विद्या जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रेयस कांबळे पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेतून राज्यकारभार सुरू करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला व मराठी भाषेचा विस्तार सुरू झाला. पुढे हीच मराठी भाषा वाढविण्यामध्ये अनेक थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे.

चक्रधर स्वामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच अनेक थोर संत यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्या वाणीने व लेखणीने मोठे योगदान दिले आहे. ही मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांचे आहे त्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झाले अतिक्रमणे झाली तरी मराठी भाषा आजही जशीच्या तशी ताट मानेने उभी आहे.

मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे व इतर भाषेतील शब्द वापरणे टाळणे काळाची गरज आहे.

थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व साहित्यिकांनी दिलेल्या योगदानातून मराठी भाषेचा कणा ताठ आहे त्यामुळे ही भाषा आपली मातृभाषा म्हणून प्रत्येकाने आईप्रमाणे जपली पाहिजे मातृभाषा टिकली तरच आपल्या अस्तित्व टिकेल त्यामुळे माय मराठी ला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात आईचे स्थान दिले पाहिजे.

यावेळी सौ जाधव एम.डी. उपशिक्षक गायकवाड ए. आय. तसेच विद्यार्थीनी तनया जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनवलकर ए. ए. यांनी केले तर आभार कु. हन्नूरे एस.एम. यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.




फलटण | कला महोत्सवात गाजले गीत | ब्रेकिंग न्यूज




दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 20: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे,  जगदीश कुलकर्णी आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.




रॅगिंगमुक्त परिसरासाठी श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा पुढाकार


अँटी-रॅगिंग’ भित्तिपत्रकांचे दिमाखात अनावरण

म्हसवड, दि. १६ (प्रतिनिधी):
रॅगिंग ही केवळ एक वाईट प्रथा नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे ‘अग्रणी महाविद्यालय उपक्रम’ व ‘अँटी-रॅगिंग समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने “रॅगिंग जागरूकता : अँटी-रॅगिंग भित्तिपत्रकांचा” अनावरण सोहळा सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) उत्साहात पार पडला.

या भित्तिपत्रकांचे अनावरण मुधोजी कॉलेज, फलटण येथील निवृत्त प्रा. उज्वला पिसाळ-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

🟡 “रॅगिंगविरुद्ध न घाबरता आवाज उठवा”

          यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. उज्वला पिसाळ-देशमुख म्हणाल्या,

“रॅगिंगसारख्या गैरप्रकारांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी धैर्याने त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्वरित महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग समितीशी संपर्क साधावा. एकमेकांचा आदर राखणे आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.”

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अ‍ॅड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने तसेच महिंद्रा ग्रुप नांदी फाउंडेशनच्या ट्रेनर कोमल बनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. संजय दिक्षित सर होते, तर आयक्यूएसी (IQAC) चेअरमन प्रा. रणवरे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.

या उपक्रमाचे नियोजन अँटी-रॅगिंग समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. प्रज्ञा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. समिती सदस्य प्रा. बी. बी. मैद, प्रा. ए. आर. माने मॅडम, प्रा. अ‍ॅड. डॉ. कुलकर्णी मॅडम व प्रा. आर. जे. पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. भित्तिपत्रकांच्या माध्यमातून रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रभावी माहिती देण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. ए. आर. माने मॅडम यांनी उपस्थित पाहुणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात शिस्त, सुरक्षितता आणि सौहार्दाचे वातावरण अधिक दृढ होईल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.




प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे आगमन

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र लोकभवनमुंबई येथे फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी आगमन झाले. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

००००




श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात ‘ एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट ‘कार्यशाळेचे आयोजन


म्हसवड :येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी व्यवसायाभिमुख विशेष उपक्रम म्हणून`महिंद्रा प्राइड क्लासरूम ‘ व ‘महिंद्रा ग्रुप ‘संचलित, नांदी फाउंडेशनच्या वतीने आयोजित बुधवार दि.११/०२/२०२६ रोजी “एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट ” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सकाळी ९. ०० ते १.०० या वेळेत सलग सहा दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत ” कॅपॅसिटी बिल्डिंग अँड स्किल असेसमेंट बोर्ड “, “महिला सबलीकरण कक्ष “, “शिवाजी विद्यापीठ स्किल डेव्हलपमेंट विभाग “व “स्वयंसिध्दा सेंटर “हे विभाग कार्यरत असून प्रोफेशनल सॉफ्ट स्किल्स ट्रेनर मा.कोमल बंडगर या सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यशाळेत समन्वयक म्हणून प्रा. निलोफर तांबोळी, प्रा.डॉ.जयश्री चव्हाण, प्रा. डॉ,प्रज्ञा माने , प्रा.डॉ नितीन भालके,प्रा.डॉ.सुजाता देशमुख व आयक्यूएसी समन्वयक प्रा.देवेंद्र रणवरे, हे प्रशिक्षणार्थी व मार्गदर्शक यांच्यात समन्वय साधणार आहेत, अशी माहिती कार्यशाळा नियोजन समितीतील प्रा.मनीषा सावंत , प्रा. अंजली माने, प्रा. एम एस चव्हाण, प्रा. डॉ. संतोष लाळगे , प्रा.बाबासाहेब मैंद यांनी दिली.

सदर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक – निंबाळकर, चेअरमन, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, कृषी उत्पन्न बाजार समिती,फलटण माजी नगराध्यक्ष फलटण नगर परिषद फलटणचे मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक- निंबाळकर ,सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक -निंबाळकर,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे व्हा.चेअरमन मा.श्रीमंत ॲड.पृथ्वीराज राजेमाने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे ट्रेझरर मा. हेमंत रानडे, प्रशासकीय अधिकारी मा. प्राचार्य अरविंद निकम हे सहकार्य करणार आहेत.

प्रस्तुत कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना कौशल्य करिअर व रोजगाराचा लाभ होणार असून बहुसंख्य विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ .संजय दीक्षित यांनी केले आहे .